वाघनखं अनावरण सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा आ. शिवेंद्रसिंहराजे; मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमवेत सर्किट हाऊस ते संग्रहालय रॅलीचे आयोजन ..

News By - Sahyadri_News
*सह्याद्री न्युज स्टार ११*
केळघर /नारायण जाधव ..
प्रतापगडावरील अद्वितीय शौर्य, पराक्रमाची साक्ष देणारी शिवरायांची ऐतिहासिक वाघनखं राजधानी साताऱ्यात दाखल झाली आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव वाघनखांची मिरवणूक काढता येणार नाही. असे असले तरी, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं सर्वप्रथम साताऱ्यात आणण्यात आली आहेत आणि ती आपल्याला प्रत्यक्ष पाहता येणार आहेत. ऐतिहासिक आणि एकमेवाद्वितीय वाघनखं छत्रपती शिवाजी संग्रहालयात ठेवण्यात आली असून त्याचे अनावरण उद्या (शुक्रवारी) होणार आहे. त्यामुळे या वाघनखांच्या स्वागत व अनावरण सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

दरम्यान, छत्रपती शिवाजी संग्रहालय येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यंमत्री अजित पवार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह सर्व आमदार- खासदार उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा कोणताही राजकीय कार्यक्रम नाही तर, छत्रपती शिवरायांप्रती असलेली निष्ठा, आदर, अस्मिता म्हणून होणार आहे. यानिमित्ताने सकाळी १० वाजता शासकीय विश्राम गृह, शिवतीर्थ ते शिवाजी संग्रहालय अशी भव्य रॅली काढण्यात येणार असून या सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असेही आ. शिवेंद्रसिंहराजेंनी म्हटले आहे.
छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक वाघनखं साताऱ्यात दाखल झाली असून ती सातारकरांना पाहण्यासाठी शुक्रवारी भव्यदिव्य कार्यक्रमाने खुली करण्यात येणार आहेत. या सोहळ्याच्या निमित्ताने आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या अध्यक्षतेखाली सुरुची कार्यालय येथे सातारा आणि जावली तालुक्यातील प्रमुख आजी- माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक झाली. या बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. शिवरायांची वाघनखं देशात कुठेही न नेता सर्वप्रथम साताऱ्यात आणण्यात आली आहेत. हा आपल्या सर्व सातारकर आणि जिल्हावासियांचा अभिमान आहे. सातारा हि मराठ्यांची राजधानी आहे. येथे छत्रपतींची गादी आहे आणि म्हणून पहिला मान आपल्या साताऱ्याला देण्यात आला आहे. हि वाघनखं साताऱ्यात ७ महिने असणार आहेत. उद्याच्या सोहळ्याला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांप्रति आपले प्रेम, निष्ठा, श्रद्धा, अभिमान, अस्मिता दाखवून द्यावी.

शासकीय विश्राम गृह येथून सकाळी १० वाजता आलेल्या मान्यवरांसोबत रॅली काढण्यात येणार असून पोवई नाका येथे शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली संग्रहालयाकडे येणार आहे. त्याठिकाणी अनावरण सोहळा पार पडेल आणि नंतर जिल्हा परिषद हॉल येथे नियोजित समारंभ होणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.










