यंदाचा कास पठार हंगाम सुरु होण्यापुर्वी रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी ..

News By - Narayan Jadhav
यंदाचा कास पठार हंगाम सुरु होण्यापूर्वी रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी..
*सहयाद्री न्युज स्टार ११*
मेढा / प्रतिनिधी .
कास पठारावरील फुलांचा हंगाम तोंडावर आलेला असून कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्याची अनेक ठिकाणी दुरावस्था झाली आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती व्हावी असे निवेदन कास पठार समितीचे माजी अध्यक्ष मारुती चिकणे व सहकाऱ्यांनी बांधकाम विभागाला दिले आहे.
जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पुष्पपठाराचा सन २०२३ चा हंगाम येत्या काही दिवसांवर आला आहे. मात्र मेढा – कुसूंबी- एकीव मार्गे कास पठारावर जाणाऱ्या रस्त्याची अनेक ठिकाणी दुरावस्था झाली असून रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच नाल्यांचे पाणी देखील काही ठिकाणी रस्त्यांवर येत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांना अडचणींचा सामना करत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेची तात्काळ दुरुस्ती व्हावी यासाठीचे निवेदन कास पठार समितीचे माजी अध्यक्ष मारुती चिकणे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आखाडे, विजय वेंदे, साहेबराव पवार, प्रमोद पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.
फोटो:मेढा: बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना मारुती चिकणे, ज्ञानेश्वर आखाडे, साहेबराव पवार व इतर.










