आपलेच जिवलग मित्र समुहाने जपली सामुहिक बांधिलकी .. फेसबुकवरील मित्रांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न ..

News By - Narayan Jadhav
- आपलेच जिवलग मित्र समूहाने जपली सामाजिक बांधिलकी
फेसबुकवरील मित्रांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…. सह्याद्री न्युज स्टार ११
- मेढा / प्रतिनिधी .
फेसबुक सातारा संचलित आपलेच जिवलग मित्र परिवाराचे दिवाळी स्नेहसंमेलन उंब्रज ता. कराड या ठिकाणी अतिशय उत्साहात पार पडले. या समूहात फेसबुक सातारा या ग्रुपच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील बहुसंख्य व्यक्ती सामाजिक भावनेने प्रेरित होऊन एकमेकांस जोडले गेले आहेत. या समूहात सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कृषी, आरोग्य, शैक्षणिक, अभियंता, पत्रकार, सामाजिक आणि राजकीय आशा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना संघटित करुन आपलेच जिवलग या विचार मंचाची गेली चार वर्षे स्थापना झाली. दरवर्षी हे दिवाळी स्नेह संमेलन सातारा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात आयोजित केले जाते. वर्षातून एक दिवस प्रत्येक जण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुट्टी काढून या संमेलनास उपस्थिती दाखवतो. आत्तापर्यंत या समूहातील सदस्यांच्या पुढाकाराने जावळी, कराड, सातारा आशा तालुक्यातील ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळी संमेलने पार पडली होती. यावर्षी हे जिवलगांचे संमेलन कराड तालुक्यातील विकासाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या उंब्रज या गावी पार पडले. या संमेलनासाठी या ग्रुपच्या असंख्य लोकांची मोलाची साथ लाभली.
या समूहाकडून दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपली जाते. यावर्षी संमेलनाच्या सकाळच्या सत्रात याच सामाजिक भावनेची जाण राखत ग्रुपमधील दातृत्ववान सद्यस्यांच्या मदतीने कोळे ता. कराड येथील राजमाता जिजाऊ या अनाथाश्रमास जीवनोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. त्यामध्ये ज्वारी, गहू, तांदूळ, तेल, मिक्सर, इस्त्री अशा विविध प्रकारच्या गोष्टींची पूर्तता केली. जिजाऊ वसतिगृहाचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष नदाफ सर यांच्या कार्याची दखल घेत आपलेच जिवलग या समूहाने मदतीचा खारीचा वाटा उचलून समाज भान जपले. दुपारच्या सत्रात उंब्रज येथील कार्यक्रम स्थळी आपल्याच ग्रुप सदस्यांनी आपले आरोग्य, सकस संतुलीत आहार आणि जीवनात व्यायामाचे महत्त्व या महत्वाच्या विषयावर सौ. निंबाळकर मॅडम यांचे सुंदर मार्गदर्शन पार पडले. संमेलनाच्या तिसऱ्या टप्प्यात शाकाहारी व मांसाहारी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आटोपला. शेवटी आलेल्या सर्व सदस्यांचे ग्रुप फोटोसेशन झाले व सर्वांनी एकमेकांच्या स्नेहभेटी घेऊन संमेलनातून निरोप घेतला. आशा पद्धतीने आजचे संमेलन समाजाला दिशादर्शक ठरले.

